Loading
नवी दिल्ली, 24 मे (हिं.स.) : अंबाला–दिल्ली महामार्गावर गुरुवारी मध्यरात्रीनंतर टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रेलर यांच्या झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मोहडा नजीक रात्री 2 वाजता हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यासंदर्भातील माहितीनुसार उत्तरप्रदेशच्या बुलंदशर येथून भाविक टेम्पो ट्रॅव्हलरने वैष्णव देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. अंबाला-दिल्ली हायवेवर मोहडाजवळ रात्री 2 वाजेच्या सुमाराला भरधाव वेगातील ट्रेलरने पाठीमागून टेम्पो ट्रॅव्हलरला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात टेम्पो ट्रॅव्हलरचे अक्षरशः तुकडे झालेत. यात 7 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये 6 महिन्यांच्या बालिकेचाही समावेश आहे. अपघातानंतर जखमी हायवेवर इकडे-तिकडे फेकले गेले होते. तर काही जखमी बसमध्येच अडकले होते. हायवेवरून जाणाऱ्यांनी तातडीने जखमींना मदत केली. पोलिसांनी अपघातस्थळी पोहोचत जखमींना 2 वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. काही जखमींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.