Mar, 13 2026

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग : ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, अभियंता अटकेत


Image Source By : Hindustan Samachar

 १४ वर्षांत प्रथमच कारवाई  चार वर्षांत एकूण १७० अपघात, ९७ प्रवाशांचा मृत्यू, २०८ जखमी

अलिबाग, ३० ऑगस्ट : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तब्बल १४ वर्षे सुरूच आहे. दरम्यान इतक्या वर्षांत प्रथमच इंदापूर ते वडपाले या २६.७ कि.मी. अंतराच्या पट्ट्यातील काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे ठेकेदाराविरुद्ध माणगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे यांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गाचे निकृष्ट काम केल्याप्रकरणी मे. चेतक एंटरप्रायझेस लिमीटेड (मे. चेतक ॲप्को (जेव्ही कॉन्ट्रॅक्टर), ५०१, नमन सेंटर, सी-३१, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पश्चिम), मुंबई-५१ या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हुकमीचंद जैन, जनरल मॅनेजर अवधेश कुमार सिंह, प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे व कंपनीच्या इतर जबाबदार व्यक्ती यांच्या विरुध्द प्रकल्प अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांनी तक्रारी केली होती. त्यानुसार माणगाव पोलीस ठाण्यात भादंवि कलम १०५, १२५ (अ) (ब) व ३ (५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. कंपनीने महामार्गाच्या रुंदीकरण व आधुनिकीकरणाचे काम सुरु केले. परंतू त्यांनी हे काम मुदतीत पूर्ण न करता दर्जाहीन काम केले. परिणामी या महामार्गास खड्डे पडले. काम पूर्ण झालेल्या ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना त्यामध्ये थर्मोप्लास्टीक पेंट (पांढ-या पट्टया), कॅट आईज, डेलीनेटर, वाहन चालकांच्या माहितीसाठीचे माहिती, सूचना फलक लावणे, अनधिकृत रस्ते दुभाजक बंद करणे आवश्यक होते. हेही काम केले नाही. त्यामुळे या महामार्गावर २०२० पासून एकूण १७० मोटार अपघात झाले. त्यामध्ये एकूण ९७ प्रवाशांच्या मृत्यू झाला. २०८ प्रवाशी जखमी झाले. त्याचप्रमाणे वाहनांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या ठेकेदार कंपनी विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बेलदार करीत आहेत.

ad