Loading
विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला ग्रामविकास विभागाची स्थगिती
अमरावती 31 ऑगस्ट । कंत्राटदाराकडून लाच घेतल्याचा आरोप असलेल्या माहुली जहागीर येथील महिला सरपंच प्रीती मनोज बुंदीले यांच्याविरोधात दाखल तक्रारीनुसार विभागीय आयुक्तांनी ७ ऑगस्ट रोजी त्यांना सरपंच आणि सदस्य पदावरून अपात्र करण्यात आल्याचा निर्णय दिला होता मात्र सरपंच प्रीती बुंदीले यांनी थेट ग्रामविकास मंत्रालयाकडे दाद मागितल्यानंतर २८ ऑगस्ट रोजी ग्रामविकास मंत्री यांनी आभासी पद्धतीने झालेल्या बैठकीत अमरावती विभागीय आयुक्त यांनी प्रीती बुंदीले यांच्याविरोधात दिलेल्या निर्णयाला स्थगिती दिली व माहुली जहागीरच्या सरपंचपदी प्रीती बुंदीले कायम राहतील असा निर्णय दिला आहे. ६ सप्टेंबर २०२३ रोजी कंत्राटदार रामबाबू गणेशराव मोंढे यांच्याकडून सरपंचपती मनोज बुंदीले यांनी चार हजार रुपयांची लाच स्वीकारली होती. लाचलूचपत विभागाच्या वतीने सरपंच प्रीती बुंदीले व मनोज बुंदीले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर अग्रीम जामीन मिळवून त्या पदावर रुजू झाल्या होत्या. माहुली जहागीर येथील भाजप कार्यकर्ते व माजी सरपंच सुधीर बीजवे यांनी याबाबत न्यायालयात तसेच विभागीय आयुक्त यांचेकडे लेखी तक्रार केली होती की, लाच घेतल्याचा आरोप असणारी व्यक्ती पदावर राहू शकत नाही त्यामुळे त्यांना अपात्र घोषित करावे. याबाबत विभागीय आयुक्तांनी ७ ऑगस्ट रोजी सुनावणी दरम्यान व प्रत्यक्ष पुराव्याच्या आधारे त्यांना सरपंच आणि सदस्य पदावरून अपात्र असल्याचा निर्णय दिला होता. मात्र या निर्णयाविरोधात सरपंच प्रीती बुंदीले यांनी ग्रामविकास मंत्रालयात धाव घेतली.ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी २८ ऑगस्ट रोजी आभासी पद्धतीने बैठक घेतली.या बैठकीत गिरीश महाजन यांनी अपिलार्थी यांनी गुन्हा केला नसून त्यांच्या पतीने गुन्हा केल्याचे दिसुन येते त्यामुळे प्रीती बुंदीले यांची बाजू समजून घेणे आवश्यक असून त्यांच्यावर असलेला अपात्रतेच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यात आली.