Mar, 13 2026

पोलीस कर्मचाऱ्याल वर्दी उतरविण्याची धमकी देणारा तुरुंगात


Image Source By : Digital Satta

अमरावती , 31 जुलै पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून वर्दी उतरविण्याची धमकी देणाऱ्याला येथील तर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र.२) पी.ए. साबळे यांनी सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. सन्नी उर्फ विजय संजय सुर्यवंशी (वय २५ रा.विलासनगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. दाखल दोषारोपपत्रानुसार गाडगेनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल निलेश अरुणराव ठाकरे हे १५ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास समन्स वाटण्याकरिता विलासनगरात जात असताना आदर्श बारजवळ त्यांना मुलांची गर्दी दिसली आणि मुले हुज्जत घालत होती. त्यामुळे ठाकरे यांनी मुलांना हटकले. तेव्हा आरोपी सन्नी त्यांच्याजवळ आला आणि त्यांची कॉलर पकडून अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. तसेच मी तुझी वर्दी उतरवितो असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर लगेच निलेश ठाकरे यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारावर पोलिसांनी कलम ३५३, २९४, ५०६ (ब) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. सदरच्या घटनेत सहायक पोलीस निरीक्षक दत्ता देसाई यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदरच्या प्रकरणात सरकारी वकील अॅड. शशीकिरण पल्लोड यांनी एकूण पाच साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश पी.ए. साबळे यांनी आरोपीला सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. सदरच्या प्रकरणात कोर्ट पैरवी म्हणुन अरुण हटवार, मुकेश परचाके आणि मुरलीधर डोईझोडे यांनी सहकार्य केले.

ad