Loading
पॅरिस, ९ ऑगस्ट : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेकमध्ये भारताच्या नीरज चोप्राने दुसरे स्थान मिळवत रौप्यपदक पटकावले. गेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने दुसऱ्या प्रयत्नात सर्वाधिक ८९.४५ मीटर भालाफेक केली. अशाप्रकारे नीरज चोप्रा ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत दोन पदके जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.
गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या स्पर्धेत पाकिस्तानचा प्रतिस्पर्धी खेळाडू अर्शद नदीमने सुवर्णपदक जिंकले. अर्शदने ९२.९७ मीटरसह ऑलिम्पिक विक्रम केला.
नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ८७.५७ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले होते, तर त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ८९.९४ मीटर आहे. जी त्याने २०२२ मध्ये स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये रौप्य पदक जिंकून मिळवली होती. मात्र दोन मीटर अधिक फेक करूनही त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
'सुवर्ण' हुकले तरी मोठा विक्रम नावावर
दोन पदके जिंकणारा चौथा भारतीय नीरज चोप्रा भलेही सुवर्णपदक जिंकू शकला नसेल, पण असे असतानाही त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. दुसरे स्थान मिळवून, दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकणारा तो स्वातंत्र्यानंतरचा केवळ चौथा भारतीय खेळाडू ठरला. स्वातंत्र्यानंतर, फक्त बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (एक रौप्य आणि एक कांस्य), कुस्तीपटू सुशील कुमार (एक रौप्य आणि एक कांस्य) आणि नेमबाज मनू भाकर (दोन कांस्य) यांनी भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत.
२६ वर्षीय नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले असते, तर ऑलिम्पिक इतिहासात जेतेपद राखणारा तो पाचवा भालाफेकपटू ठरला असता. ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत पुरुष भालाफेक करणाऱ्यांमध्ये एरिक लेमिंग (स्वीडन, १९०८ आणि १९१२), जॉनी मायरा (फिनलंड, १९२० आणि १९२४), चोप्राचे आदर्श जॅन झेलेंजी (चेक प्रजासत्ताक, १९९२ आणि १९९६) आणि आंद्रियास टी यांचा समावेश आहे.
सुवर्णपदक हुकल्याचे दुःख!
सुवर्णपदक हुकल्याचे दुःख असल्याची भावना नीरजने व्यक्त केली. तसेच येणाऱ्या काळात खेळात नक्कीच सुधारणा होईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. देशासाठी आपण जेव्हाही पदक जिंकतो, तेव्हा आनंद होतो. रौप्य पदक जिंकलो, त्याचा आनंद आहेच. मात्र, सुवर्ण पदक हुकल्याचे दुःखही कुठं तरी मनात आहे. पण आता स्वत:मध्ये सुधारणा करण्याची वेळ आहे. याबाबत टीम बरोबर बसून चर्चा करेन, अशी प्रतिक्रिया नीरज चोप्राने दिली.
येणाऱ्या काळात नक्कीच पदकांच्या संख्येत वाढ होईल!
यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सर्वच भारतीय खेळाडूंचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. कुणीही टोकियो ऑलिम्पिकमधील पदकांची तुलना या ऑलिम्पिकमधील पदकांशी करू नये, यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक खेळाडूने त्यांच्या सर्वोत्तम खेळ केला आहे. प्रत्येक वेळी पदकांशी संख्या वाढेलच असं नसतं. पण येणाऱ्या काळात नक्कीच पदकांच्या संख्येत वाढ होईल, असा मला विश्वास आहे. देशवासियांना माझ्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. याची मला जाणीव आहे. पण प्रत्येक खेळाडूचा एक दिवस असतो. काल अर्शद नदीमचा दिवस होता. मी माझा सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न केला, मात्र, मला यश मिळालं नाही. खेळात विजय-पराजय होत राहतात. मात्र, येणाऱ्या काळात मी नक्कीच माझ्या खेळात सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन, असं त्याने सांगितले.