Mar, 13 2026

पादचाऱ्यास चिरडणाऱ्यास एक महिन्याचा कारावास ; ५० हजार दंड


Image Source By : Digital Satta

मिरा रोड, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भरधाव वाहन चालवत एका पादचाऱ्यास उडवून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मोटार चालकास ठाणे न्यायालयाने एक महिन्याचा साधा कारावास व ५० हजार रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आणखी १० दिवसांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. तत्कालीन काशिमीरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत २८ मे २०२१ रोजी हा अपघात घडला. मनीष रमेश शाह (वय ५२) यांनी वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव मोटार चालवून एका पादचाऱ्यास उडवले. त्या अनोळखी पादचाऱ्याचा मोटारीच्या जबर धडकेत मृत्यू झाला. शाह यांनी अपघातानंतर जखमी व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी नेण्याऐवजी पळून जाणे पसंत केले.२८ मे रोजी सायंकाळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. ९ जून रोजी मनीष शाह यांना अटक करण्यात आली. काशिमीरा पोलिस ठाण्याचे तत्कालीन तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन पोतदार यांनी तपास केला होता. विद्यमान वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट कारकून हवालदार आर. एन. गायकवाड यांनी न्यायालयात पैरवी केली. सहायक सरकारी अभियोक्ता किरण वेखंडे यांनी पोलिसांच्या वतीने बाजू मांडली.फिर्यादी, पंच, इतर साक्षीदार यांच्या साक्षीवरून आणि तपास अधिकारी यांच्या तपासावरून मनीष शाहविरुद्ध पुरावा सिद्ध झाल्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो. आर. आर. भगत यांनी आरोपी शाह यांना एक महिना साधा कारावास व ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १० दिवस कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

ad