Mar, 13 2026

पं. बंगाल सरकारला सर्वोच्च न्यायालयानेही खडसावले


Image Source By : Digital Satta

कोलकाता येथील डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येचे प्रकरण

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये बलात्कार प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. याप्रकरणी आज, मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने देशातील डॉक्टरांच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली. याशिवाय सुरक्षेसाठी राष्ट्रीय स्तरावर टास्क फोर्स तयार करण्याची सूचनाही दिली आहे.

याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. डॉक्टरांच्या सुरक्षेशी संबंधित हा मोठा मुद्दा असल्याने आम्ही स्वत:हून दखल घेतली, असे न्यायालयाने म्हटले आहे. 9 ऑगस्ट रोजी सेमिनार हॉलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता.या प्रकरणाची सुनावणी करणारे सरन्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड म्हणाले की, 'सकाळी गुन्हा उघडकीस आल्यानंतर मुख्याध्यापकांनी ही आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न केला आणि पीडितेच्या पालकांनाही मृतदेह देखील पाहू दिला नाही. तसेच घटना उजेडात आल्यानंतर 'रात्री उशिरापर्यंत एफआयआर नोंदवण्यात आला नव्हता. याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यास झालेला उशीर आणि घटनास्थळी नासधूस केल्याबद्दल राज्य सरकारला खडसावले आहे. सरन्यायमूर्ती म्हणाले की, 'आरजी कार हॉस्पिटलमध्ये 36 तासांपासून शिफ्टमध्ये असलेल्या डॉक्टरवर बलात्कार झाला. मृतांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले गेले. त्यानंतर 13 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग केले. तर 15 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12.30 वाजता एका जमावाने आपत्कालीन वॉर्ड आणि इतर ठिकाणी घुसून तोडफोड केली. यानंतर आयएमएने देशभरातील आपत्कालीन सेवा 14 तासांसाठी बंद ठेवण्याचे आवाहन केले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य यंत्रणा तैनात करणे अपेक्षित आहे. राज्य हे का करू शकले नाही हे आम्हाला समजत नसल्याचे सरन्यायमूर्ती म्हणाले. 'डॉक्टर आणि महिला डॉक्टरांची सुरक्षा हा राष्ट्रहिताचा मुद्दा आहे आणि समानतेचे तत्त्वही तेच सांगते. देश काही पावले उचलण्यासाठी दुसऱ्या बलात्काराची वाट पाहू शकत नाही. आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी राज्यात कायदे आहेत, परंतु ते प्रणालीगत समस्यांना सामोरे जात नसल्याचे न्यायालय म्हणाले. दरम्यान मेडीकल कॉलेजमधील प्राचार्यांच्या भूमिकेची चौकशी सुरू असताना त्यांना लगेचच दुसऱ्या कॉलेजचे प्राचार्य कसे बनवण्यात आले..? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला. सीबीआयला या शनिवारी स्टेटस रिपोर्ट दाखल करावा लागेल आणि तो संवेदनशील पातळीवर असल्याने आम्हालाही स्टेटसची माहिती द्यावी लागेल.

गेल्या 9 ऑगस्ट रोजी कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. महिला डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला, मात्र कोलकाता उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शवविच्छेदन अहवालात पीडितेच्या खाजगी अवयवांसह शरीराच्या अनेक भागांवर 14 हून अधिक जखमा आढळल्या आहेत. पोलिसांनी संजय रॉय नावाच्या आरोपीला अटक केली आहे.या घटनेनंतर देशभरात डॉक्टरांची निदर्शने सुरू झाली. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने कायदा करावा, अशी मागणी अनेक डॉक्टर मंडळी करत होते. नुकतेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रुग्णालयांमधील सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

ad