Loading
नवी दिल्ली, ७ ऑगस्ट : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत दोन पदकांची कमाई करणाऱ्या मनू भाकरचे आज (बुधवारी) दिल्ली विमानतळावर आगमन झाले. यावेळी क्रीडाप्रेमींनी तिच्यासह प्रशिक्षक जसपाल राणा यांचे ढोल ताशांच्या गजरात पुष्पहार घालून जल्लोषात स्वागत केले. यावेळी तिने हात उंचावून अभिवादन केले.
हरियाणातील झज्जर येथील रहिवासी असलेल्या मनू भाकरने इतिहास रचला. तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 10 मीटर वैयक्तिक आणि 10 मीटर मिश्र स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावले आहे. अशी कामगिरी करणारी मनू भाकर ही देशातील पहिली खेळाडू बनली आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात मनू भारताची ध्वजवाहक असेल. रविवारी समारोप समारंभासाठी ती पॅरिसला परतणार आहे.
विमानतळावर तिच्या पालकांनी तिला मिठी मारून स्वागत केले. मनूने माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना सांगितले की, भारतासाठी पदकं जिंकल्याचा मला खूप खूप आनंद झाला आहे. मी खूप आनंदी आहे, इतके प्रेम मिळाल्याने खूप आनंदही झाला आहे. आपले ॲथलिट्स यापुढेही चांगली कामगिरी करतील असा मला विश्वास आहे. अनेक पदकं भारताला मिळाली पाहिजेत, असं मत मनू भाकरने व्यक्त केलं आहे.