Loading
चंद्रपूर 8 मे (हिं.स.):- चंद्रपूर - जिल्ह्यातील गोंडपिपरी येथे तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर दोन्ही मुलांचे मृतदेह बुधवारी सकाळी मिळाले. स्थानिक शिवाजी चौक येथील १४ वर्षीय गौरव विलास ठाकूर व १५ वर्षीय शौर्य भास्कर पिंपळशेंडे अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत.
मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास काही मुले फिरायला गेली होती. त्यानंतर तेव्हा न्यायालयाच्या मागील बाजूस असणाऱ्या तलावात मुलांना पोहण्याचा मोह झाला. त्यावेळी तलावात पोहत असताना २ मुले बुडाली. हे दृश्य पाहून इतर मुले घराकडे घाबरून पळाली. घरी परतून त्यांनी याची कोणालाच कल्पना दिली नाही. दोन मुले सायंकाळी घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेणे सुरू केले. पण मुले पोहायला गेली असे कळल्यावर त्यांनी तलावाकडे धाव घेतली असता त्या ठिकाणी दोन मुलांचे कपडे सापडले. घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरीचे पोलीस निरीक्षक रमेश हट्टीगोटे हे आपल्या पथकासह तलावाजवळ दाखल झाले. मुलांचा शोध घेण्यासाठी शोध पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र रात्र झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. बुधवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरु झाल्यावर दोन्ही मुलांचे मृतदेह पथकाच्या हाती लागले.