Loading
सोलापूर, 7 ऑगस्ट सोलापूरसह पुणे, अहमदनगर, धाराशिव अशा शहर- जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात २०१९ मधील सर्व्हेनुसार १४ टीएमसी गाळ आहे. त्यात अंदाजे पावणेतीन कोटी ब्रास वाळू आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ११७.२८ टीएमसी असून त्यात १४ टीएमसीहून जास्त गाळ असल्याची सद्य:स्थिती आहे. राज्यातील कोकण विभाग सोडून अन्य विभागांमधील पाच प्रमुख धरणांमधील गाळ काढण्यासंदर्भातील निविदांची कार्यवाही आता गतिमान केली जात आहे. नागपूर विभागातील गोसीखुर्द, छत्रपती संभाजी नगर विभागातील मुळा व जायकवाडी, जळगाव विभागातील गिरणा आणि पश्चिम महाराष्ट्रातील महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडील उजनी धरणातील गाळ काढण्यात येणार आहे. उजनी धरणाची साठवण क्षमता ११७.२८ टीएमसी आहे, पण पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरलेले धरण दरवर्षी उन्हाळ्यात उणे होते. त्यासाठी धरणातील १४ टीएमसीपेक्षा जास्त असलेला गाळ देखील कारणीभूत आहे. तो गाळ काढण्यासाठी २०१९ मध्ये सर्व्हे झाला, पण त्यानंतर विविध टप्प्यांवर गाळ काढण्याची कार्यवाही थांबली होती. आता प्रारूप निविदा समितीने अहवाल तयार केला असून, त्याला कृष्णा खोरे विकास महामंडळाने सहमती देखील दिली आहे. त्यामुळे आता जलसंपदा विभागाकडून मान्यता मिळाल्यानंतर अंतिम निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.