Loading
अजित पवारांनी घेतली अमित
शहांची भेट
मुंबई, 24 जुलै मुंबईत
मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि संघ परिवारातील इतर काही संघटनांची
बैठक झाली. यात महायुती आणि निवडणूक या विषयांवर चर्चा झाली. ही बैठक पार पडल्यावर
रात्री उशिरा अजित पवार दिल्लीला रवाना झाले. तिकडे जाऊन मध्यरात्री 1 वाजता
त्यांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. या घडामोडींवरून राजकीय वर्तुळात
चर्चेला पेव फुटले आहे.
मुंबईच्या लोअर परळ, प्रभादेवी
परिसरातील यशवंत भवन नामक संघ कार्यालयात झालेल्या बैठकीत संघाचे सहसरकार्यवाह
अरुणकुमार, अतुल लिमये, अखिल भारतीय सहसंघटनमंत्री
शिवप्रकाश उपस्थित होते. या बैठकीत भाजपतर्फे देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष
चंद्रशेखर बावनकुळे यांनी हजेरी लावली होती. त्यासोबतच या बैठकीला भारतीय मजदूर
संघ (भामसं) विश्व हिंदू परिषद (विहिप), भारतीय किसान संघ
(भाकिस) यांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीच्या एका सत्रात उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.संघ परिवरातील
ऑर्गनायझर (इंग्रजी साप्ताहिक) आणि विवेक (साप्ताहिक) यातून भाजपच्या सत्तेतील
सहयोगी पक्षांवर टीका कर्यात आली होती. याविषयावर सदर बैठकीत चर्चा झाली. तसेच
लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात अपेक्षित यश मिळाले नाही.यापार्श्वभूमीवर आगामी
विधानसभा निवडणुकीत संघाकडून मदत मिळावी अशी अपेक्षा भाजपकडून व्यक्त करण्यात आली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या आग्रहास्तव अजित पवारांना भाजपने सोबत घेतले
आहे. परंतु, संघाला अजित दादांशी असलेली युती मान्य नसल्याचे राजकीय वर्तुळात
बोलले जाते. योगायोगाने मुंबईत संघाची बैठक झाल्यानंतर रात्री अजित पवारांनी
आपल्या 2 खासदारांसह दिल्ली गाठली. मध्यरात्री 1 वाजता अमित शहांची भेट घेऊन चर्चा
केली. गेल्या 20 आणि 21 जुलै रोजी अमित शहा पुणे भेटीवर असताना त्यांची
राष्ट्रवादीच्या नेत्यांशी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर
लगेच अजित पवार दिल्लीला रवाना झालेत. आगामी विधानसभा निवडणूक आणि मंत्रिमंडळ
विस्तार या विषयावर पवार आणि शहांमध्ये चर्चा झाल्याचा राष्ट्रवादीमधील काही
लोकांचा दावा आहे. परंतु, या चर्चेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यातील भाजपचा
सर्वात मोठा चेहरा असलेले फडणवीस का नव्हते...? हा प्रश्न सध्या राज्याच्या
राजकारणात केंद्रस्थानी आहे.