Loading
अहमदनगर, 29 ऑगस्ट :- अहमदनगर एमआयडीसीच्या कामगारांना रात्री-अपरात्री रस्त्यात अडवून मारहाण करुन त्यांना लूटण्याच्या घटना घडत असताना सर्व कामगारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एमआयडीसीच्या कामगारांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी पोलीस गस्त वाढवून या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी स्वराज्य कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष दत्ता तापकिरे,जनरल सेक्रेटरी योगेश गलांडे, सुनील कदम, स्वप्निल खराडे, प्रदीप दहातोंडे, अभिजीत सांबारे, अजिनाथ शिरसाठ, जितेंद्र तळेकर, अमोल ठोकळ, सचिन दाताळ, भरत दिंडे, सोपान कदम, सोमनाथ बारबोले, रामनाथ घुगे,वसीम शेख,सचिन खेसे,राहुल मेहेरखांब,किसन तरटे,बाबासाहेब गांगर्डे,आप्पासाहेब बोंबले,शरद काळे,अविनाश कर्डिले, सोमनाथ शिंदे, उमेश जंबोकर, महेश जाजगे, विष्णू घुगे आदींसह कामगार वर्ग उपस्थित होते.एमआयडीसीत रात्री कामगार घरी जाताना त्यांना रस्त्यात अडवून मारहाण करुन लुटण्याचे प्रकार सातत्याने घडत आहे.यामुळे कामगारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एमआयडीसी कंपनीमध्ये तीन शिपमध्ये काम चालते. कामगारांचे पगार ५ ते १० तारखे दरम्यान होतात, याच कालावधीत त्यांना लुटण्याचे घटना घडलेल्या आहेत. चोरांच्या टोळक्यांकडून पल्सर सारख्या विना नंबरच्या गाडी वरून मागून येऊन त्यांना अडवून रॉडने किंवा दांडक्याने मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल, पैसे काढून घेतले जात आहे. यामध्ये कामगारांना जबर मारहाण केली जात असून, या घटनेत एखाद्याचा जीव जाण्याची वेळ आली असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.एमआयडीसी रस्त्यालगत काही पान टपऱ्या असून, तेथे हातभट्टी, दारू विक्री केली जाते. याच ठिकाणी गुंड व गुन्हेगारी प्रवृत्ती पोसली जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तातडीने पोलीस प्रशासनाने रात्री ९ ते १२ या वेळेत गस्त वाढवावी, रस्त्यालगत असलेल्या पान टपऱ्यांच्या नावाखाली सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई व्हावी, लुटमार करणाऱ्या चोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.